नाशिक : घरातील एका रूममध्ये भाडेकरू म्हणून राहणा-या तरूणाने नऊ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार वडाळागावात समोर आला आहे. जीवे मारण्याची धमकी देत संशयिताने हे कृत्य केले असून याप्रकरणी मुलाच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिताच्या आजीने दिलेल्या तक्रारीनुसार वडाळागावात सदर महिला आपल्या कुटूबियांसमवेत राहते. याच घरातील एका रूममध्ये संशयित तरूण काही महिन्यांपासून भाडेतत्वावर राहत होता. भाडेकरू आणि महिलेचा नऊ वर्षाच्या नातूमध्ये ओळख वाढल्याने तो त्याच्या रूममध्ये जात असे. शनिवारी (दि.२७) रात्री मुलगा नेहमी प्रमाणे भाडेकरूच्या घरी गेला असता ही घटना घडली. जीवे मारून शेजारच्या नाल्यात फेकून देण्याची धमकी देत संशयिताने मुलाशी अश्लिल चाळे करीत त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. जखमी अवस्थेत मुलाने घर गाठून आपल्या आजीकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार समोर आला. आजीने भाडेकरूचे घर गाठले मात्र तत्पूर्वीच तो पसार झाला होता. याबाबत पोलिस दप्तरी अनैसर्गिक कृत्य आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे करीत आहेत.