नाशिक : परस्पर वाहन गहाण ठेवल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विश्वासघात केल्याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाडेतत्वावरील वाहनाचा मोबदला न देता ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी राहूल सुधाकर पिंगळे (रा.लक्ष्मीनगर,राणाप्रताप चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. हेमंत गोसावी,राहूल सांगळे आणि पवन संधू अशी विश्वासघात करणा-या संशयितांची नावे आहेत. पिंगळे यांच्या मालकिची मालवाहू महेंद्रा पिकअप एमएच १५ जीव्ही ९०९६ ही संशयित गोसावी व सांगळे यांनी भाडेतत्वावर घेतली होती. दरमहा २४ हजार रूपये भाडे देण्याचा १९ फेब्रुवारी २०२२ रोजी करार करण्यात आला होता. मात्र गेली पाच ते सहा महिन्यांचे भाडे संशयितांनी दिले नाही. याबाबत चौकशी आणि वाहनाचा शोध घेतला असता संशयितांनी मालवाहू पिकअप अमोल आंधळे यांच्याकडे दोन लाख रूपयांना गहाण ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत संशयितांना जाब विचारला असता पवन संधू याने संदिप संधू यांच्या नावे असलेला धनादेश दिला. प्रत्यक्षात हा बंद खात्याचा धनादेश असल्याचे समोर आल्याने पिंगळे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.