नाशिक : जत्रा हॉटेल भागात कारमधून आलेल्या टोळक्याने बेदम मारहाण करीत अनोळखी तरूणाचे अपहरण केल्याची घटना घडली. गौरव बबन सुर्यवंशी (रा.कोणार्क नगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्यवंशी हे शनिवारी (दि.२७) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या घराकडे जात असतांना ही घटना निदर्शनास आली. सीडी डॉन एमएच ४१ क्यू ७७५२ वरील मोटारसायकलस्वार भरधाव वेगात महामार्गाने प्रवास करीत असतांना पाठलाग करीत आलेल्या सिल्व्हर रंगाच्या इरर्टीका कारमधील टोळक्याने त्यास अडविले. यावेळी सदर दुचाकीस्वारास दोन ते तीन जणांच्या टोळक्याने अज्ञात कारणातून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रसंगी टोळक्याने जखमी अवस्थेतील दुचाकीस्वारास आपल्या वाहनात कोंबून कारमधून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेची पाहणी करीत दुचाकी हस्तगत केली असून अपहृतासह कारमधील टोळक्याचा शोध घेतला जात आहे. उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.