नाशिक : भूखंडाची परस्पर विक्री करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदनिका बुकिंगचे आमिष दाखवून पैसे स्विकारुन भूखंडाची परस्पर विक्री केल्यामुळे उपनगर पोलिस ठाण्यात महेश गंगावानी,विजय गंगवानी,दिलीप गंगवानी,मधू महतानी (रा.सर्व दत्तमंदिररोड) व नितीन जगळे (रा.जगतापमळा,ना.रोड) यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. आहे. याप्रकरणी कविता किरण धोंगडे (रा.शंकर महादेव कॉलनी,दत्तमंदिररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपींचा मे.हिमगीरी बिल्डर्स नावाचा व्यवसाय असून त्यांनी सन.२०११ मध्ये शिवाजी धोंगडे मार्गावरील भूखंडावर हिमगिरी हाईटस या नावाची चार मजली इमारत उभारणीबाबत फलक लावला होता. त्यामुळे कविता धोंगडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. या इमारतीतील दुस-या मजल्यावरील ९८६ चौ.फुट मापाची सदनिका घेण्याचे महिलेने निश्चित केले होते. १ एप्रिल ते १ जून २०११ दरम्यान या व्यवहारापोटी तीन लाख रूपयांची रक्कम स्विकारत संशयितांनी साठे खत करून दिले होते. मात्र कालांतराने या विकासकाने सदरचा भूखंडच विक्री केल्याचे समोर आले. साठे खताच्या आधार घेत महिलेने न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला असता सदरचे साठेखतही बनावट असल्याचे पुढे आल्याने महिलेने पोलिसांचे उंबरठे झिजविले. मात्र न्याय मिळाला नाही त्यामुळे महिलेने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने संशयितांविरूध्द फसवणुकीसह विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक डगळे तपास करीत आहेत.