नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारसह ७ लाख ४२ हजार ८० रूपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करुन चालकास गजाआड केले आहे. या घटनेत इनोव्हा कारच्या चोर कप्यातून लाखोंच्या दारूची वाहतूक केली जात असल्याचेही उघड झाले आहे. नाशिक त्र्यंबकरोडने बेकायदा मद्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असल्याची माहिती एक्साईजच्या ब विभाग पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पपया नर्सरी भागात नाकाबंदी करीत पथकाने वाहन तपासणी केली असता दारूने भरलेली इनोव्हा कार पथकाच्या हाती लागली. चालकास बेड्या ठोकत पथकाने कारसह दारूसाठा हस्तगत केला आहे. मुकेश शिवाजीभाई बागुल (२९ रा.लक्ष्मीनगर,कडापूल जि.सुरत) असे बेकायदा मद्यवाहतूक प्रकरणी अटक केलेल्या इनोव्हा कार चालकाचे नाव आहे. जीजे ०५ सीजी ३८७० या इनोव्हा कारचालकास ताब्यात घेत पथकाने वाहन तपासणी केली असता या वाहनास चोर कप्पा असल्याचे समोर आले. अधिक तपासात या चोर कप्यात दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशात विक्रीस उपलब्ध असलेली व महाराष्ट्रात बंदी असलेला मद्यसाठा मिळून आला. ही कारवाई अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ब विभागाचे निरीक्षक एस.एस.देशमुख,दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकूर,एम.आर.तेलंगे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक एच.एस.नेहेरे जवान विजेंद्र चव्हाण,रमाकांत मुंढे,किरण कदम,गोकूळ परदेशी आदींच्या पथकाने केली.