नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावर दोन महिलांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहे. या पर्स मधून चोरट्यांनी रोकडसह महत्वाची कागदपत्र लांबविली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत पुणे येथील महिलाची पर्स लांबविण्यात आली. पुणे येथील पल्लवी संदिप इसोकर या देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. रामकुंडावर तीर्थ स्नान करून त्या कपालेश्वर मंदिरात गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खांद्यावरील पर्सची चैन उघडून पाकिट चोरून नेले. या पाकिटात २० हजाराची रोकड वाहनाची कागदपत्र, लायसन्स, एटीएम कार्ड आणि महत्वाची कागदपत्र होती. तर दुसरी घटनेत नाशिकच्या महिलेची पर्स लंपास करण्यात आली. सिडकोतील योगिता नितीन हुल्लळे (रा.महाराणाप्रताप चौक) या देवदर्शनासाठी गोदा घाटावर गेल्या होत्या. देवदर्शनासाठी त्या रांगेत उभ्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून तीन हजाराची रोकड हातोहात लांबविली. दोन्ही घटनांचा तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.