नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– व्दारका परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव मालट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दोघे भाऊ जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. शरद शंकर शिलावट (३८) व काळू शंकर शिलावट (४० रा.दोघे नागोजीचे मळगाव ता.मालेगाव) अशी जखमी भावांची नावे असून त्यात काळू शिलावड जखमी झाला आहे. याप्रकरणी शरद शिलावट यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञात ट्रकचालकाविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिलावट बंधू बुधवारी सकाळच्या सुमारास एमएच ४१ एडब्ल्यू ८८४१ या प्लॅटीना दुचाकीने उड्डाणपुलावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मुंबईनाक्याकडून द्वारकाच्या दिशेने दोघे भाऊ प्रवास करीत असतांना गोदावरी हॉटेल समोर पाठीमागून भरधाव येणा-या अज्ञात मालट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघे भाऊ जखमी झाले असून त्यातील काळू शिलावट यांच्या हातावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने ते गंभीर अवस्थेत आहे. ट्रकचालक आपल्या वाहनासह पसार झाला असून अधिक तपास पोलिस नाईक भोये करीत आहेत.