नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात कौटूंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नीच्या गळयावर वार करण्यात आल्यामुळे ती जखमी झाली आहे. याप्रकरणी शैला झोंबाड (३४ रा.लोखंडेमळा) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश दिनेश झोंबाड (४० रा.आंबेडकरनगर,म्हसरूळ) असे पत्नीवर हल्ला करणा-या पतीचे नाव आहे. झोंबड दांम्पत्यात कौटूंबिक वाद असून ते विभक्त राहतात. दिंडोरीरोडवरील भाजीपाला मार्केटमध्ये काम करून हे दांम्पत्य आपआपला उदनिर्वाह करीत असून, पत्नीने पोलिसात तक्रार दिल्याने ही घटना घडली. गुरूवारी दुपारच्या सुमारास पत्नी शैला या मार्केट यार्डातील हरिओम भाजीपाला कंपनीच्या शेडमध्ये काम करीत असतांना हा हल्ला झाला. संतप्त पतीने तिला गाठून पोलिसात का तक्रार दिली याबाबत जाब विचारला. यावेळी त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत आपल्या पत्नीच्या गळयावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत महिला जखमी झाली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.