नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी परिसरात जाधव पेट्रोलपंपावरील महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने तलवारीने वार केले आहे. प्रेमसंबधातून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पेट्रोलपंपाच्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पाथर्डी गाव-वडनेर रोड येथे हा पेट्रोल पंप आहे. दिवसा-ढवळ्या ही घटना घडल्याने शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. जखमी झालेली ही महिला जाधव पेट्रोलियम या पेट्रोल पंपवरची पेट्रोल भरवायचे काम करते, महिलेचे नाव जुबेदा खान असे आहे. या महिलेवर धारदार शस्त्र तलवारीने अज्ञात व्यक्तीने सपासप अनेक वार केले. त्यानंतर ही व्यक्ती फरार झाली आहे. तिला तत्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.