नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेडच्या लोखंडी खांबात विद्यूत प्रवाह उतरल्याने भाडेकरूचा शॉक लागून मृत्यू झाल्यामुळे घरमालकावर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज मिटरमध्ये फेरफार करीत घरातील वायरींगचा सदोष पध्दतीने वापर केल्यामुळे आडगाव पोलिसांनी हा कारवाई केली आहे. संतोष श्रीधर जोशी (रा.महाराजा बॅण्ड समोर नांदूरनाका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित घरमालकाचे नाव आहे. जोशी यांच्या घराच्या एका रूममध्ये भाडेतत्वावर राहणा-या सुभाष रावसाहेब गायकवाड यांचा गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. लोखंडी शेडच्या खांबात विद्यूत प्रवाह उतरल्याने ही घटना घडली होती. पोलिस तपासात घराच्या वीज मिटरमध्ये फेरफार करून जोशी यांनी निष्काळजीपणे सदोष पध्दतीने वायरींग केली होती. त्या सदोष वायरींगमळे घरात विज प्रवाह उतरल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ यांच्या तक्रारीवरून घरमालक जोशी यांच्याविरूध्द सदोष मनुष्य वधासह केंद्रीय विद्यूत प्राधिकरण निमिमय अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष शिदे करीत आहेत.