नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वेळोवेळी बलात्कार करणा-या तरुणांविरुध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्कार आणि माहिती अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम पंडित असे संशयिताचे नाव असून तो औरंगाबाद येथील असल्याचे कळते. संशयिताने नातेवाईकांमध्ये अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुने नाशिक भागात राहणा-या महाविद्यालयीन तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या मैत्रीणीने गेल्या मे महिन्यात संशयिताशी ओळख करून दिली होती. यावेळी संशयिताचे राम पंडीत नाव असल्याचे खोटे सांगण्यात आले होते. संशयिताने पीडितेच्या संपर्कात राहून एके दिवशी शालिमार भागात तिला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी त्याने माझे तुझ्यावर प्रेम असून मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगून पीडितेला नजीकच्या लॉजवर नेले. या ठिकाणी त्याने नकळत मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत बळजबरीने बलात्कार केला. तसेच पांडवलेणी भागात घेवून जात बनावट मंगळसूत्र परिधान करून फोटो काढले. यानंतर ब्लॅकमेल करून पीडितेस औरंगाबाद येथील एका लॉजवर घेवून जात संशयिताने मारहाण करीत वेळोवेळी बलात्कार केला. कुटुंबियांशी संपर्क साधत संशयिताने जीवे ठार मारण्याची आणि फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कोर्ट मॅरेज करून देण्याची मागणी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास निरीक्षक ठाकूर करीत आहेत.