नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुकानाच्या गल्यातील पैसे चोरणा-या परप्रांतिय नोकराला पोलिसांनी गजाआड केले आहे. ही चोरी सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. निहाल उदयभान यादव (३० रा.मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित नोकराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीची भरत मनोहर मुसळे (रा.सिरीन मेडोज,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. मुसळे यांचे सिरीन मेडोज भागात अमुल आईस्क्रीम पार्लर नावाचे दुकान असून संशयित तेथील कामगार आहे. गेल्या ९ मे रोजी व्यवस्थापक अजय पाघेरे याचे लक्ष नसल्याची संधी साधत संशयिताने गल्यातील २२ हजार ४०० रूपयांची रोकड हातोहात लांबविली होती. सीसीटिव्ही यंत्रणेत ही बाब कैद झाल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.