नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इर्टीगा कारची परस्पर विल्हेवाट लावून कार मालकाला दमदाटी केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सलमान अब्दूल रहेमान मुल्ला (रा.कुर्ला मुंबई) व दिपक मनोहर हंसवाणी (रा.रामेश्वरनगर, आनंदवली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी अनिल मथुराप्रसाद गुप्ता (रा. नेरूळ, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. गुप्ता गेल्या २७ मे रोजी शहरात आले होते. द्वारका भागातील गोदावरी हॉटेल परिसरात थांबलेले असतांना दोघा परिचीतांनी त्यांना गाठले. यावेळी संशयित मुल्ला याने देवळाली कॅम्प येथे बहिणीकडे जावून येतो असे सांगून गुप्ता यांची एमएच ४३ बीयू ६२१९ ही इर्टीगा कार घेवून गेला होता. दोघे संशयित परिचीत असल्याने गुप्ता यांनी विश्वासाने कार त्यांच्या स्वाधिन केली. मात्र बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने संपर्क केला असता दोघांनी संगणमत करीत कारची विल्हेवाट लावली.
गुप्ता यांनी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. विश्वास घात झाल्याचा संशय येताच गुप्ता यांनी पोलिसात धाव घेतली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही अखेर त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात याबाबत सुनावणी होवून संशयितांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.