नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेयसीला फिरवण्यासाठी प्रियकराने दुचाकीची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत भद्रकाली गुन्हे पथकाने प्रियकराला अटक केली आहे. या घटनेत प्रेयसी अल्पवयीन असल्याने तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. केवळ प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरी करणा-या या प्रियकरांला मात्र ही चोरी चांगलीच महागात पडली आहे.
गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात दुचाकी चोरीट्या घटनेत वाढ होत असल्यामुळे पोलिस या चोरांच्या मागावर असतांनाच चोरी करणारा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात सापडला. या घटनेतील प्रेयसी व प्रियकर हे सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या हाती लागले आहे. काठे गल्ली परिसरातील सार्थक बोरसे यांची दुचाकी चोरी झाली होती. या चोरीची तक्रार बोरसे यांनी पोलीस स्थानकात दिल्यानंतर अज्ञात संशयिताविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भद्रकाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली. त्यात चोरीच्या दुचाकीसह तरुण-तरुणी आढळून आले होते. त्या आधारे गुन्हे शोध पथकाने तपास सुरु केला. त्यानंतर प्रियकर व त्याची अल्पवयीन प्रेयसी दोघे जेलरोड परिसरात चोरीच्या दुचाकीवर फिरत असल्याचे पोलिसांना आढळले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी रमेश कोळी यांच्या पथकाने जेलरोड परिसरातून या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रियकर जेलमध्ये गेला तर प्रेयसी ही कुटुंबीयांसोबत घरी गेली.