अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; १ लाख ७८ हजार रूपयाचा गुटखा जप्त
नाशिक – त्र्यंबक दरवाजा भागातील एका गोडावूनवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकत १ लाख ७८ हजार रूपये किमतीचा बेकायदा गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गोडावून मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. शाहरूख नवाब पठाण (२६ रा.म्हाडा बिल्डींग,वडाळागाव) असे अटक केलेल्या गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्न निरीक्षक अमित रासकर यांनी तक्रार दाखल केली आहे. गुटखा आणि सुगंधी सुपारी विक्रीस बंदी असतांनाही शहरात त्याची राजरोसपणे विक्री व वाहतूक सुरू आहेत. सहज उपलब्ध होणारा व आरोग्यास घातक असलेला गुटखा रोखण्यासाठी एफडीएने आता थेट मुख्यवितरकांना लक्ष केले असून रासकर यांच्या भरारी पथकाने सोमवारी त्र्यंबक दरवाजा परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. सोनम लेडीज टेलर्स खाली असलेल्या गोडावूनमध्ये संशयित गुटखा विक्री करतांना मिळून आला. या गोडावून मधून सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रूपये किमतीचा पानमसाला,गुटखा आणि सुगंधी सुपारी हस्तगत करण्यात आली. उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.
विवाहीतेने गळफास लावून घेत केली आत्महत्या
नाशिक : ३० वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना तिडके कॉलनीतील मातोश्रीनगर भागात घडली आहे. शितल सुनिल कांबळे (रा.सुमन पुष्पा बंगला,वॉचमन खोली,नेल्सन हॉस्पिटल मागे) असे मृत महिलेचे नाव आहे. कांबळे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कांबळे यांनी सोमवारी (दि.२७) सकाळच्या सुमारास घरात कुणी नसतांना अज्ञात कारणातून पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. पती सुनिल कांबळे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी मृत घोषीत केले. जमादार आडके तपास करीत आहेत.