नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गंजमाळ, पंचशीलनगर भागात दोन गटात मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटात एकमेकांना भिडले. या हल्ल्यात दोन्ही बाजूंच्या गटांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका रिक्षाचे नुकसान झाले. परिसरात बंदोबस्त तैनात असून संशयितांचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांसह दंगलनियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यामुळे परिसरात रात्री उशीरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. या राड्याने व्यावसायिकांनी त्यांची दुकाने त्वरित बंद केली. तर शालिमार – व्दाराका रस्त्यावरील वाहतुक काही काळ खोळंबली. या घटनेमुळे रात्रभर या भागात फिक्स पॉइंट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, संजय बारकुंड, सहायक आयुक्त दिपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले होते.