जेलरोडला भरदिवसा धाडसी घरफोडी; अडीच लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना जेलरोड येथील कॅनोलरोड भागात घडली. याप्रकरणी अस्मिता आकाश पवार (रा.शास्त्रीपार्क बिल्डींग,गोसावीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार कुटुंबिय गुरूवारी सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्रावरमध्ये ठेवलेले सुमारे २ लाख ५४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात मंगळसुत्र, गंठण,कर्न फुले,सोनसाखळी,अंगठ्या आणि पैंजन आदी अलंकारांचा समावेश आहे. या घरफोडी प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.
पाईपलाईन रोड भागात दोन लाखाचे दागिणे चोरट्यांनी केले लंपास
नाशिक : पाईपलाईन रोड भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला रमेश बळेल (रा.ओंकार रेसि.फॉग सिटी हॉटेल जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या २९ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. बळेल या आपल्या घरकामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात प्रवेश करून ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत कपाटातील सुमारे २ लाख ७ हजार ५०० रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, मंगळसूत्र, सोनसाखळया, अंगठ्या आदी अलंकाराचा समावेश आहे. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.