नाशिक : औद्योगीक वसाहतीतील जाधव संकुल भागात मायलेकींवर एकाने रस्त्यावरच धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. यात दोन्ही महिला जखमी झाल्या आहे. याप्रकरणी मणकर्णाबाई वसंत पाटील यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक जाधव (२२ रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,जाधव संकुल) असे महिलांवर हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. पाटील या वृध्दा शुक्रवारी मुलगी छाया सरोदे व नातेसमवेत परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असतांना ही घटना घडली. संशयिताने मायलेकींना गाठत जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त संशयिताने दोघी महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोघी महिलेंच्या हातावर वार करण्यात आल्याने त्या जखमी झाल्या असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.









