नाशिक : ७२ वर्षीय डॉक्टर महिलेस सव्वा अकरा लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. लंडन येथून गिफ्ट पाठविण्याचे सांगून पार्सलच्या खर्चापोटी विविध आमिषे दाखवत हा गंडा घालण्यात आला आहे. गंगापूररोडवरील रामेश्वरनगर भागात राहणा-या प्रसिध्द वृध्द डॉक्टर महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात आमिष दाखविणा-यांसह पैसे वर्ग करण्यात आलेल्या बँक खातेधारकांविरूध्द फसवणूक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विदेशात सेवाभावी वैद्यकीय सुविधा पुरविणा-या संस्थेच्या माध्यमातून एका महिलेने वृध्द डॉक्टरशी संपर्क साधला होता. वृध्दा दानशुर असल्याचे लक्षात येताच सदर महिलेने सोशल साईडवरून वृध्देशी सलगी वाढविली. या काळात ९३१९६४५३४१ या क्रमांकावरून तिने संस्थेच्या कामकाजाची माहिती देत वृध्द महिलेस युनियन बँक खाते ०१५१२२०१००००६१४ या क्रमांकावर तीस हजाराची देणगीची रक्कम भरण्यास भाग पाडले. हा प्रकार गेल्या मे महिन्यात घडला. देणगी पदरात पडताच सदर महिलेचा बॉसने वृध्देशी संपर्क साधला. डॉ. अॅलेक्स नामक बॉसने ४४७३८५३०४९५४ या क्रमांकावरून संपर्क साधून संस्थेस मदत केल्याने आभार मानले. यावेळी लंडन येथून गिफ्ट पाठवित असल्याचे भासवून भामट्यांनी विविध आमिष दाखवित तसेच वेळोवेळी संपर्क साधत वृध्द डॉक्टरला कोटक महिंद्रा बँक खाते क्रमांकावर ९५४६५३६२२६ रोख रक्कम भरण्यास भाग पाडले. या घटनेत वृध्देची ११ लाख २३ हजार रूपयांची फसवणुक झाली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुरज बिजली करीत आहेत.