तोतया पोलिसांनी वृध्दाची केली फसवणूक; ६० हजार रुपयाचे दागिने केले लांबवले
नाशिक : जेलरोड भागात तोतया पोलिसांनी वृध्दाचे ६० हजार रुपयाचे दागिने लंपास केले. चक्कर मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृध्दास गाठून दुचाकीस्वारांनी सोनसाखळीसह अंगठी असे दागिने चोरुन नेले. पंढरीनाथ महादू जाधव (७२ रा.लोखंडेमळा, हनुमंतानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव बुधवारी दुपारी जेवण आटोपून पायी चक्कर मारण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. परिसरातील स्कीम नं. १ च्या कॉलनी रोडवर ते फेरफटका मारत असतांना दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. पोलिस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी गळय़ातील सोनसाखळी आणि अंगठी सुरक्षीत काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने ६० हजार रूपये किमतीचे अलंकार पळविले. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.
……..
रोहित्र्यातील ७० लिटर ऑईलसह ४५ किलो वजनाचे तांब्याचे वाईडींगची चोरी
नाशिक : हिरावाडीरोड भागात चोरट्यांनी वीज कंपनीच्या रोहित्र्यातील ७० लिटर ऑईलसह ४५ किलो वजनाचे तांब्याचे वाईडींग चोरून नेले. हिरावाडी रोडवरील शक्तीनगर भागात असलेल्या महावितरणच्या सिध्दीविनायक रोहित्र क्र.४२५२८५७ चे बुधवारी चोरट्यांनी अेबी स्विच बंद करून ही चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी बंद डीपीचे झाकण उघडून त्यातील टॉप प्लेट खोलून रोहित्र्यांच्या टाकीतील सुमारे ७० लिटर ऑईल आणि ४५ किलो वजनाचे तांब्याचे वाईडींग असा सुमारे ३२ हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण विनायक बेलदार (रा.विद्यूतनगर,दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.