रूग्णालय प्रशासनाने दोघां चोरांना रंगेहात पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन
नाशिक : रूग्णालयातील मेटालीक स्टील बॅ्रकेटची चोरी करणा-या दोघां चोरांना रूग्णालय प्रशासनाने रंगेहात पकडून संशयितांना पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. गणेश दशरथ जेडगुले आणि नितीन बाळू बोराडे (रा.रामोशीवाडा, वडाळागाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ताराचंद उदयप्रताप सिंग (रा. जयभवानीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
सिंग शहरातील नामांकित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे कामकाज बघतात. गेल्या काही दिवसांपूर्वी रूग्णालयातील बांधकामाचे साहित्य ठेवायच्या स्टोअर रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे २५ हजार रूपये किमतीचे मेटालीक स्टील ब्रॅकेटचे २५० नग चोरून नेले होते. ही बाब रूग्णालय प्रशासनाने गांभिर्याने घेतल्याने दोघे पोलिसांच्या हाती लागले. सीसीटिव्ही यंत्रणेसह सुरक्षा यत्रणा वाढविण्यात आलेली असतांना गुरूवारी पहाटेच्या सुमारास दोघे संशयित दुसरे स्टोअररूम फोडतांना मिळून आले. संशयितांना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
उंटवाडी भागात ६७ हजाराचा ऐवज चोरीला
नाशिक : उंटवाडी भागात बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ६७ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश असून ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब विठ्ठलराव दराडे (रा.वरद अपा.तिडकेनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दराडे कुटुंबिय पुणे येथे कामानिमित्त गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.१४) रात्री बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवेले सोन्याचांदीचे दागिणे आणि पाच हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.