नाशिक : शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तीन घटना पुन्हा समोर आल्या. गेल्या काही दिवसात अशा घटना घडत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तीन मुलींचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. वेगवेगळया भागात राहणा-या या मुलींना कुणी तरी पळवून नेल्याचा संशय वर्तविला जात आहे. याप्रकरणी आडगाव,अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकलहरा मेनगेट भागात राहणारी मुलगी सोमवारी (दि.८) कॉम्प्युटर क्लासला गेली ती अद्याप घरी परतली नाही. हनुमाननगर भागात राहणा-या शंकर शाली नामक तरूणाने तिला पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काकड करीत आहेत. आडगाव पोलिस ठाणे हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी गेल्या १ ऑगष्ट पासून बेपत्ता आहे. सर्वत्र शोध घेवूनही ती मिळून न आल्याने कुणी तरी तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला असून, याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोत घडली. सिडको भागात राहणारी अल्पवयीन मुलगी रविवारी सायंकाळी पवननगर भागात पर्स खरेदी करण्यासाठी गेली होती ती अद्याप घरी परतली नाही. सर्वत्र चौकशी करूनही ती मिळून न आल्याने कुणी तरी तिचे अपहरण केल्याचा संशय कुटूंबियांनी वर्तविला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.