नाशिक : सिडको परिसरात नऊ वर्षीय बालिकेवर ५५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (रा.महाराणा प्रताप चौक,सिडको) असे संशयिताचे नाव आहे. नऊ वर्षीय पीडिता गेल्या मंगळवारी आपल्या घराच्या पाठीमागील रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कार,बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
संशयिताने तिची वाट अडवित परिसरातील एका घराच्या पाठीमागील आडबाजूला ओढून नेले. या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करीत त्याने बळजबरीने पीडितेवर बलात्कार केला. यावेळी संशयिताने तुला वडील नाहीत त्यामुळे वाच्यता केल्यास आईसह कुटूंबातील सर्वांना जीवे मारेल अशी धमकी दिली. जखमी अवस्थेत कसेबसे घर गाठल्याने ही बाब उघडकीस आली. कुटुंबियांच्या चौकशीत तिने आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी बलत्कार,पोक्सो आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ संशयितास अटक केली असून अधिक तपास सहाय्यक आयुक्त सोहेल शेख करीत आहेत.