नाशिक : सिडकोतील पवननगर भागात पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीत खेळत असतांना तोल जावून पडल्याने १८ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. समृध्दी राहूल खैरनार (रा.साईज्योत अपा.कृष्णा साडी मागे,पवननगर) असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून समृध्दी रविवारी रात्री आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत असतांना ही घटना घडली होती. अचानक तोल जावून बाल्कनीतून सोसायटीच्या आवारात कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली होती. कुटुंबियांनी तात्काळ तिला गंगापूररोडवरील साफल्य हॉस्पिटल येथे दाखल केले होते. या घटनेत तिच्या मेंदूत रक्तश्राव झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतू अल्पावधीतच वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.