नाशिक– पखालरोड वरील सात्त्विक नगर भागात प्रादेशिक परिवहन अधिका-यास बापलेकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन तक्रारीवरुन दंडात्मक कारवाई करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक जमिर तडवी हे संशयिताच्या घरी गेले होते. त्यावेळेस त्यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर त्यांचा चष्मा फोडून वर्दीची नेमप्लेट तुटली. या घटनेनंतर तडवी यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बिलाल अत्तार (६५) व तौसिफ बिलाल अत्तार (३४ रा.मायरान शाळेजवळ) अशी संशयिताची नावे आहेत.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, आरटीओ पोर्टल वर ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्याने तडवी रविवार सकाळच्या सुमारास दंडात्मक कारवाई करण्यासाठी संशयिताच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी दुचाकीवरील कारवाईचे ३ हजार ७५० रूपयाचे चलान दिले. यावेळी अत्तार यांनी चलान न भरता, पावती स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तडवी यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या झटापटीत तडवी याचा चष्मा आणि गणवेश नेमप्लेटचे नुकसान झाले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा, मोटार वाहन कायदा व विवीध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.