सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील बंगाली बाबा भागात गोडावूनच्या प्रवेशद्वाराजवळ झोपलेल्या सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदर आसाराम काजल (२४) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चंदर काजल हे सर्वज्ञ ट्रेंडर्स या कंपनीच्या बंगाली बाबा भागातील गोडावूनवर सुरक्षा रक्षक म्हणून काम बघतात. या गोडावूनच्या प्रवेशद्वारावरच काजल यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१८) दुपारच्या सुमारास ते मेन प्रवेशद्वार जवळ झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.
वृध्द महिलेच्या गळयातील मोहनमाळ व दुपदरी सोनसाखळी चोरट्यांनी ओरबडली
नाशिक – चेतनानगर भागातील आयोध्यानगरीत वृध्द महिलेच्या गळयातील मोहनमाळ व दुपदरी सोनसाखळी असा सुमारे ४७ हजाराचा ऐवज दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. शुभदा प्रभाकर कुलकर्णी ( ७२ रा.सावतानगर,सिडको ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी या शनिवारी मुलीचे सासर असलेल्या चेतनानगर भागात गेल्या होत्या. रात्री जेवण आटोपून त्या जावयाच्या आई समवेत शतपावली करीत असतांना ही घटना घडली. दोन्ही व्याहिनी आयोध्यानगरी भागातून फेरफटका मारीत असतांना दुचाकीवर आलेल्या त्रिकुटापैकी एकाने त्यांच्या गळयातील दुपदरी सोनसाखळी व मोहन माळ असा सुमारे ४७ हजाराचे दागिणे ओरबाडून नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.