नाशिक : जुने सिबीएस भागात येथे बसमध्ये चढणा-या मुंबईच्या वृध्द महिलेच्या गळयातील ९५ हजार किंमतीचा लक्ष्मी हार चोरट्यांनी लंपास केला. गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली आहे. बसमध्ये बसल्यानंतर ही गोष्ट वृध्द महिलेच्या लक्षात आली. या चोरीप्रकरणी सिताबाई मंगळू गबाले (६५ रा.मलूंड,मुंबई) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गबाले या बहिण मिराबाई यांच्यासमवेत शनिवारी शहरात आल्या होत्या. सायंकाळी दोघी बहिणी इगतपुरी येथे जाण्यासाठी सीबीएस बसस्थानकात आल्या असता ही घटना घडली. प्लॅटफार्मवर दोघी बहिणी गर्दीतून बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ९५ हजार रूपये किमतीचा सोन्याचा लक्ष्मी हार हातोहात लांबविला. ही बाब बसमधील आसनावर दोघी बहिणी बसल्या असता समोर आली. अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.