नाशिक – पखालरोड भागात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे पावणे पाच लाख रूपयाचा ऐवज लंपास केला आहे. कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत ही घरफोडी करण्यात आली. या घरफोडीत ५० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरीला गेले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावीद खाटीक (रा.तन्वी अपा.रॉयल कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खाटीक कुटूंबिय दि.१ ते ५ ऑगष्ट दरम्यान जळगाव येथे गेले असता ही घटना घडली. कुटुंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी खाटीक यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४ लाख ७५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बाळू गिते करीत आहेत.