चाकूचा धाक दाखवत दोघांनी तरूणाच्या खिशातील मोबाईल काढून घेतला
नाशिक – मेनरोड भागात चाकूचा धाक दाखवत दोघांनी तरूणाच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली. राहूल विनायक पगारे (१९ रा.चाचडगाव ता.दिंडोरी) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पगारे ३० जुलै रोजी कामानिमित्त शहरात आला होता. रात्री मेनरोड परिसरातील गाडगे महाराज पुतळा भागातील लाल वाईन्सच्या पाठीमागील बोळीतून तो पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्याला चाकूचा धाक दाखविला तर दुस-याने पाठीमागून कॉलर पकडून बळजबरीने खिशातील सुमारे १२ हजार रूपये किमतीचा मोबाईल काढून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
……
चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल चोरट्यांनी केले लंपास
नाशिक – जुने नाशिक परिसरातील काझीगढी भागात चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. सागर हनुमान सुर्यवंशी (रा.कुभारवाडा,अमरधाम रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्यवंशी कुटुंबिय बुधवारी (दि.३) आपल्या घरात असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जींगला लावलेले सुमारे ३१ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पठारे करीत आहेत.