महिलेस फरफटत नेवून विनयभंग; दोन जणांवर गुन्हा दाखल
नाशिक : पिंपळगाव बहुला येथे दोघांनी महिलेस फरफटत नेवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. शेत जमिनीच्या वादातून हे कृत्य करण्यात आले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनानाथ शंकर घुगे व विष्णू शंकर घुगे (रा.दोघे पिंपळगाव बहुला) अशी संशयितांची नावे आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे नातेवाईक असून त्याचा जमिन जुमलाही एकमेकांना लागून आहे. दोघा कुटुंबियात शेतजमिनीवरून वाद असून आंबे तोडण्याच्या वादातूनही महिलेस मारहाण करण्यात आली होती. ९ जून रोजी रात्री दोन्ही कुटुंबियात वाद झाला होता. यावेळी दोघा संशयितांनी महिलेस गोठ्याबाहेर फरफटत नेवून अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
>>>
बांधकाम साईटवरून लोखंडी प्लेटा चोरीला
नाशिक : मखमलाबाद शिवारात आरसीसी बांधकामासाठी लागणा-या लोखंडी प्लेटा बांधकाम साईटवरून चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुमारे ११ हजार ७०० रूपये किमतीच्या प्लेटांवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शिवलाल खैरणार (रा.स्वामी विवेकानंदनगर,मखमलाबाद) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खैरणार यांचे मखमलाबाद शिवारातील मानकर मळ््यात आळंदे यांच्या बांधकाम साईटवर काम सुरू आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी साईटवर ठेवलेल्या आरसीसी बांधकामाच्या प्लेटा चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक वसावे करीत आहेत.