नाशिक : महामार्गावरील गोविंदनगर भागात भरधाव दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत अॅक्टीव्हास्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दीपक मधुकर सोनवणे (३५ रा.आशापुरी विश्वास मंदिराजवळ सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे गेल्या १३ जुलै रोजी गोविंदनगर कडून इंदिरानगर बोगद्याच्या दिशेने सर्व्हीसरोडने आपल्या अॅक्टीव्हावर एमएच १५ ईव्ही ८५६४ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. बोगद्याकडून मुंबईनाक्याच्या दिशेने भरधाव जाणा-या पल्सरने एमएच ०४ एफबी ९४७८ अॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातात सोनवणे यांच्यासह पल्सरस्वार शंकर गोविंद पवार (रा.वरखड जि.यवतमाळ) हे जखमी झाले होते. तसेच या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस नाईक बहिरम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पल्सरस्वार शंकर पवार यांच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार आडके करीत आहेत.