नाशिक – गेल्या काही दिवसापासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असतांना पोलिसांच्या हाती एक दुचाकी चोर हाती लागला आहे. या चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी स्थापन केलेल्या अॅन्टी मोटार सायकल थेप्ट पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची अॅक्टीव्हा हस्तगत करण्यात आली आहे. शेख शहनवाज साबुद्दीन शेख (१९ रा.खडकाळी भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताच्या अटकेने भद्रकाली पोलिसांचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.
दुचाकी चो-याचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशान्वये परिमंडळ निहाय अॅन्टी मोटारसायकल थेप्ट पथकांची निर्मीती करण्यात आली असून स्थानिक पोलिसांसह ही पथके चोरट्यांना हुडकून काढत आहेत. परिमंडळ १ चे उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाचे कर्मचारी संतोष पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चोरीच्या दुचाकी बाळगणारा संशयित एनडी पटेल रोडवरील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
संशयिताने आपल्या ताब्यातील अॅक्टीव्हा खडकाळी भागातून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेत पथकाने अॅक्टीव्हा हस्तगत केली. संशयिताच्या अटकेने दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे, पोलिस नाईक प्रभाकर सोनवणे,शिपाई संतोष पवार,अनिल आव्हाड,इरफान शेख,तुळशीदास चौधरी,विश्वजीत राणे,संदिप रसाळ,श्रीकृष्ण पडोळ,शिवाजी मुंजाळ,गोरक्ष साबळे, तुकाराम कुंभार आदींच्या पथकाने केली.