नाशिक : अशोका मार्ग भागात रूग्णाच्या उपचाराच्या बिलावरून तिघांनी एका हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरला दमदाटी व धमकी देत या गोंधळ घातला. याप्रकरणी सुप्रीम हेल्थ अॅण्ड ट्रॉमा केअर सेंटर हॉस्पिटलच्या डॉ.सुषमा प्रशांत भुतडा (रा.आदित्यनगर,अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन मुंबईनाका पोलिस ठाण्यात वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार प्रतिबंध व नुकसान किंवा मालमत्ता नुकसान) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण खैरे, वैशाली बनसोड व अन्य एक अशी संशयितांची नावे आहेत. संशयित प्रविण खैरे यांनी ३० जुलै रोजी आजारी पत्नी सुनिता खैरे यांना सुप्रीम हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारानंतर बुधवारी पेशंटला सोडण्यात आले. या काळात हॉस्पिटलचे ३० हजार तर मेडिकलचे १९ हजार ८४५ रूपये बिल झाले. रूग्ण सोडतांना त्यांच्याकडे ३९ हजार ८४५ रूपयांची मागणी करण्यात आल्याने संशयितांनी गोंधळ घालत डॉ. भुतडा यांच्या अंगावर धावून जात दमदाटी केली. जास्तीचे बिल लावले असा आरोप करीत संशयितांनी तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत अपशब्द वापरले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.