नाशिक : शिंदेगावात चाईनिज दुकानासमोर अॅटोरिक्षा पार्क केल्याने दोघा भावांसह एकास चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. याघटनेत लोखंडी पळीने मारहाण करण्यात आल्याने दोघे भाऊ जखमी झाले आहे. याप्रकरणी मिलींद भास्कर साळवे (३२ रा.शिंदे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉबी निरभवणे, भिमराव निरभवणे, रोहित निरभवणे व दिपक नामक तरूण अशी मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. साळवे सोमवारी रात्री शरद सुकदेव शिंदे या मित्रास सोबत घेवून किराणा घेण्यासाठी गावातील एका दुकानात गेले होते. किराणा दुकानाशेजारील साई कॉर्नर चाईनिज दुकानासमोर साळवे यांनी आपली अॅटोरिक्षा पार्क करून ते किराणा घेण्यासाठी दुकानात गेले असता ही घटना घडली. संशयितांनी दुकानासमोर रिक्षा का लावली याचा जाब विचारत साळवे यांच्या रिक्षात बसलेल्या मित्रास शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी साळवे व परिसरातून जाणारा भाऊ संदिप साळवे यांनी धाव घेतली असता चाईनिज दुकानमालकासह टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. या घटनेत दोघा भावांना लोखंडी पळीने मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.