नाशिक : गोदावरीत आंघोळ करीत असतांना पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पंधरा वर्षीय बालकाचा मृतदेह तब्बल तेरा दिवसानंतर मिळून आला आहे. शुभम धिवराजी उफाळे (१५ रा.अनुसयानगर,काठेगल्ली) असे पुर पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. एकलहरा शिवारात त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उफाळे २२ जुलै रोजी गोदावरी नदीला आलेल्या पूरात आंघोळीसाठी गेला होता. गोदाघाटावरील दुतोंड्या मारूती भागात तो आंघोळ करीत असतांना बुडाला होता. ही बाब लक्षात येताच जीवरक्षकांसह अग्निशमन दलाने त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नव्हता. तेरा दिवसानंतर एकलहरा येथील गंगावाडी भागातील नदी किनारी त्याचा मृतदेह हाती लागला आहे. याबाबत नांदूरनाका भागातील सचिन हिवाळे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.