नाशिक : बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर तारण सदनिकेची खरेदी केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. बँक अधिकारी आणि कर्मचा-यांशी कट कारस्थान रचून ही खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी आशुतोष रघूनाथ राठोड (रा.राजराजेश्वरी चौक,पंचक) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रेम जगुमल कारडा व अन्य अशी संशयितांची नावे आहेत. राठोड यांनी २००३ मध्ये पंचक शिवारातील सर्व्हे नं. ४८ मध्ये असलेल्या इमारतीतील फ्लॅट क्र.२ व ३ या आपल्या सदनिका तारण ठेवून युनियन बँकेकडून एक कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची मुदतीत परतफेड न केल्याने संशयितांने १ जानेवारी २००३ ते २७ नोव्हेंबर २००७ दरम्यान परस्पर कॉलेजरोडवरील युनियन बँकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांशी हातमिळवणी करून सदर मालमत्ता जप्त असल्याचे भासवून बनावट कागदपत्राच्या आधारे सदर मालमत्तेची बँकेकडून खरेदी करून घेतली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.