कारखान्यात काम करत असतांना चक्कर येवून पडल्याने २९ वर्षीय कामगार महिलेचा मृत्यू
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात काम करत असतांना चक्कर येवून पडल्याने २९ वर्षीय कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रियंका विजय गुंजाळ (रा.सुर्योदय कॉलनी,खुटवडनगर) असे मृत महिला कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुंजाळ या सातपूर औद्योगीक वसाहतीतील जहागिरदार फ्रुट प्रा.लि. या कारखान्यात नोकरीस होत्या. मंगळवारी (दि.२) नेहमीप्रमाणे त्या सेवा बजावत असतांना ही घटना घडली. काम करीत असतांना अचानक चक्कर येवून त्या पडल्या होत्या. या घटनेत त्या बेशुध्द झाल्याने कारखाना प्रशासनाने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.
तरूणाने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : २९ वर्षीय तरूणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. सज्जनसिंग बच्चनसिंग परनादिया (रा.विघ्नहर रो हाऊस,विश्वासनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. परनादिया याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परनादिया याने गेल्या २० जुलै रोजी आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.