नाशिक : पिंपळगाव खांब येथील भवानीनगर भागात शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबियात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडनेर दुमाला येथील सुनिल राजाराम सोनवणे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित गणेश व दीपक पंडीत पाटील (रा.सदर) या दोन्ही भावांनी शनिवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे म्हटले आहे. सोनवणे हे पिंपळगाव खांब येथे जात असतांना संशयितांनी आपल्या घराजवळ त्यांची वाट अडवून शेतीच्या बांधावरून का भांडण करतो तसेच नारायण मोंढे यांच्या सोबात दिवाणी न्यायालयात सुरू असलेली केस मागे घे या कारणातून वाद घालत शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी गणेश पाटील याने जीवे मारण्याची धमकी देत लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तर पंडीत केरू पाटील (७५ रा.भवानीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित सुनिल सोनवणे याने सर्व्हे न.१११ मध्ये दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करीत माझी जमिन आहे. तुमचा काही संबध नाही असे म्हणत तोंडावर बुक्की मारल्याने दात पाडल्याचे म्हटले आहे. अधिक तपास जमादार कोकाटे व सातभाई करीत आहेत.