मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी विविध कंपन्याचे ३१ मोबाईल चोरले
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी विविध कंपन्याचे ३१ मोबाईल चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली आहे. पृथ्वीराज इंद्रदेव निशाद (रा.गणपती गल्ली,खालचे चुंचाळे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निशाद यांची संजीव नगर भागात पत्र्याच्या शेडमध्ये मोबाईल दुरूस्ती आणि विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरला लावलेले लॉक कश्याने तरी उचकटून दुरूस्तीचे आणि नविन असे सुमारे ६२ हजार रूपये किमतीचे ३१ मोबाईल चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृध्द ठार
नाशिक : नाशिक पुणे मार्गावरील दत्त मंदिर सिग्नल जवळ भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ६५ ते ७० वयोगटातील वृध्द ठार झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश जारस (२६ रा.सुभाष रोड) या युवकाने याप्रकरणी खबर दिली आहे. ६५ ते ७० वयोगटातील वृध्द रविवारी (दि.३१) रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. नाशिक पुणे मार्गावरील दत्तमंदिर सिग्नल परिसरातील भंडारी ज्वेलर्स समोर भरधाव अज्ञात वाहनाने वृध्दास जोरदार धडक दिली. या अपघातात वृध्द गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.