नाशिक – गंगापूर रोड व जेलरोड भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणीसह रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील अलंकार ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या. शनिवारी रात्री याप्रकरणी गंगापूर आणि उपनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना जेलरोड भागात घडली. आशा बाळक्रुष्ण घायवटे (रा.चद्रश्वर नगर जुना सायखेडारोड) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. घायवट या शनिवारी रात्री औषधे घेण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. सैलानी बाबा स्टॉप येथील मेडिकल स्टोअर मधून औषधे घेऊन त्या रामेश्वर नगर येथील गणपती मंदिर समोरून पायी जात असताना काळ्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील साठ हजार रूपये किमतीचे गंठण ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना ही गंगापूर रोडवर घडली. भाग्यश्री आनंद बुटे (रा. शांतिनिकेतन कॉलनी, गंगापूर रोड) या शनिवारी रात्री आकाशवाणी कडून डिके नगर मार्गे आपल्या घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघापैकी एकाने त्याच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची एक तोळा वजनाची चेन ओरबाडून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.