नाशिक : शिंगाडा तलाव येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणा-यास पोलिसांनी गजाआड केले आहे. शाहिद परवेज गुलाम मुर्तजा शेख (३० रा.मोमीनपुरा,फवाराचौक नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. स्टेट बँकेच्या मुबई मुख्यालयातून याबाबत नियंत्रण कक्षास कळविण्यात आल्याने अवघ्या काही वेळातच संशयित पोलिसांच्या हाती लागला. ही घटना बँकेच्या मुंबई मुख्यालयात निदर्शनास आल्याने तात्काळ शहर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. याबाबत माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेत सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी करीत सारडा सर्कल भागात संशयितास जेरबंद केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शेख याने गुरूवारी पैसे चोरण्याच्या उद्देशाने लॉकसेफ्टी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. या घटनेबाबत अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.