नाशिक – बांधकाम व्यावसायीकाकडे कामगारानेच तब्बल ४७ लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ईडी आणि एसीबीकडे तक्रार देण्याची धमकी हा कामगार देत होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने चार तासाच्या आत या कामगारा गजाआड केले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारोती रमेश खोसरे (३५ रा.ऋषीकेश रो हाऊस ध्रुवनगर,बबन लॉन्ससमोर शिवाजीनगर) असे संशयित खंडणीखोराचे नाव आहे. याप्रकरणी समिर सिताराम सोनवणे (रा.महात्मानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
सोनवणे यांनी सोमवारी या कामगाराल बोलावून घेत पाच लाख रूपयांची रोकड दिली. मात्र तरीही त्याने उर्वरीत रकमेसाठी तगादा लावल्याने सोनवणे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांसह शहर गुन्हे शाखेने संशयिताच्या शोध घेतला व चार तासात शोध मोहिम राबवित शिवाजीनगर भागात संशयितास पकडले. त्याच्या ताब्यातून खंडणीची पाच लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले,अंमलदार रविंद्र बागुल,अनिल दिघोळे,प्रदिप म्हसदे,आसिफ तांबोळी,शरद सोनवणे,प्रविण वाघमारे,नाझिम पठाण,वसंत पटाईत,प्रशांत मरकड,महेश साळुंके,विशाल देवरे,रावजी मगर,कविश्वर खराटे,आण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.
अशी दिली धमकी
मारोती रमेश खोसरे हा शरणपूररोडवरील सोनवणे यांच्या सुशय डेव्हलपर्स या कार्यालयात नोकरीस होता. नोकीर करत असतांना त्याने महत्वाचा डाटा संगणकातून काढून घेतला. त्यानंतर त्याने खंडणीची मागणी केली. २४ जून ते २५ जुलै दरम्यान त्याने सोनवणे यांचे मित्र रमाकांत डोंगरे यांना गाठून ही ब्लॅकमेलींग केली. व्यवसायात गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत महत्वाचे कागदपत्र असलेली फाईल त्याने डोंगरे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी त्याने ईडीआणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार करण्याची धमकी सुध्दा दिली होती.