नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड परस्पर विक्री करणा-या चार जणांविरुध्द इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश भटू जाधव (रा.विसे मळा,कॅनडा कॉर्नर), मिथीला अशोक खताळे, पयस्विनी अशोक खताळे (रा.दोघी पुणे) व मोहनदास वसंतराव महाले (रा.तोरणानगर,सिडको) अशी भूखंडाची परस्पर खरेदी विक्री करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी किशोर झुंबरलाल खिंवसरा यांनी तक्रार दाखल केली आहे. खिंवसरा यांची बहिण मनिषा खिंवसरा यांनी १९९१ मध्ये अशोक शबाजी पाटील यांच्या मालकीचा पाथर्डी शिवारातील प्लॉट क्रमांक ८४ हा भूखंड रितसर खरेदी करून विकत घेतलेला आहे. २१ ऑक्टोबर १९९१ मध्ये त्याबाबत खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच सात बारा उता-यावर त्याबाबत इतर अधिकारात नोंदणी केलेली असतांना संशयितांनी १ फेब्रुवारी २००७ नंतर बनावट कागदपत्राच्या आधारे व ते खरे असल्याचे भासवून सदर भूखंडाची परस्पर नोंदणीकृत खरेदी विक्री केली. यामुळे खिंवसरा यांचे आर्थिक नुकसान झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सय्यद करीत आहेत.