नाशिक : मेरी लिंकरोड भागात परप्रांतीयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी परप्रांतीय तरूणासह त्याच्या साथिदाराविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. सुरजकुमार बाल्मिकी सिंग (२० मुळ बिहार,हल्ली निर्मलनगर पोलिस चौकी जवळ,रासबिहारी मेरी लिंक रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. याप्रकरणी बारा वर्षीय पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयित व त्याचा साथीदार पीडितेची पाठलाग करीत होते. मंगळवार २१ ते २३ जून दरम्यान संशयितांनी मेरी लिंकरोड भागात मुलीची वाट अडवित विनयभंग केला. यावेळी मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जर माझ्यावर प्रेम केले नाही तर तुझ्या वडिलांना व भावास मारेल तसेच तुला बिहारला पळवून नेईल अशी धमकी दिल्याने भेदरलेल्या मुलीने आपल्या कुटूंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाय.एस.माळी करीत आहेत.