नाशिक : मखमलाबाद मार्गावरील ड्रीम कॅसेल सिग्नल भागात भरधाव दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. यमुनाबाई जगन्नाथ भालेराव (रा. गोदावरी बेकरी जवळ, क्रांतीनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली आहे. यमुनाबाई भालेराव या बुधवारी (दि.२७) रात्री नातू प्रसाद संजय भालेराव यांच्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. मृत आजी व नातू मखमलाबादकडून क्रांतीनगरच्या दिशेने दुचाकीवर प्रवास करीत असतांना ड्रीम कॅसल सिग्नल भागात भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात यमुनाबाई भालेराव या मोटारसायकलवरून पडल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. डोक्यास,पायास व पाठीस दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिस नाईक संतोष कोरडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात नातू प्रसाद भालेराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घिसाडी करीत आहेत.