गर्ल्स होस्टेलमधील अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
नाशिक : गर्ल्स होस्टेलमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता झाल्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मुलगी गावी न पोहचल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली आहे. नंदूरबार येथील १७ वर्षीय युवती गेल्या अनेक महिन्यांपासून शिकवणीसाठी कृषीनगर जॉगिंगट्रॅक भागातील मनोहर कॉलनीतील प्रमिला गर्ल्स होस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी (दि.२५) गावी जात असल्याचे सांगून ती गर्ल्स होस्टेलमधून बाहेर पडली. मात्र नंदूरबारला पोहचली नाही. या घटनेची माहिती पालकांना कळविण्यात आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून आपल्या मुलीचे कुणी तरी अपहरण केल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.
सेंट्रीग प्लेटा चोरीला
नाशिक : औद्योगीक वसाहतीतील अशोक नगर भागात शाळे जवळील मोकळया जागेत ठेवलेल्या सेंट्रीग प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण चंद्र बहादूर छत्री (रा.ध्रुवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. छत्री यांचा नुतन बांधकामावर स्लॅप टाकण्याचा व्यवसाय आहे. अशोकनगर भागात त्यांची कामे सुरू असल्याने त्यांनी हिंदी शाळेजवळील जीवनगंगा रो हाऊस परिसरातील मोकळया जागेत सुमारे २२ हजार ४०० रूपये किमतीच्या लोखंडी सेट्रींग प्लेटा ठेवलेल्या होत्या. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्या चोरून नेल्या. अधिक तपास पोलिस नाईक आव्हाड करीत आहेत.