नाशिक : शहरातील वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन दुचाकींसह एक सायकल चोरट्यांनी चोरीला गेली आहे. याप्रकरणी म्हरूळ,इंदिरानगर व उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना महामार्गावरील कमोदनगर भागात घडली. समकित सुरेश राका (रा.गोविंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राका यांची एमएच १५ इक्यू ८४९८ दुचाकी गेल्या शनिवारी (दि.२३) महामार्गावरील हॉटेल ग्रेट पंजाब शेजारील कमोद कॉम्प्लेक्समधील त्यांच्या दुकानासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत. तर दुसरी घटना आडगाव शिवारात घडली. महेश अजय गायधनी (रा.दिंडोरीरोड) हे बुधवारी आडगाव शिवारात गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते म्हसरूळ आडगाव लिंकरोडने आपल्या दुचाकीवर घराकडे परतत असतांना चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल पळवून नेली. जगन्नाथ लॉन्स परिसरात ते रस्त्यावर दुचाकी लावून लघूशंकेसाठी काही अंतरावर गेले असता ही घटना घडली. रस्त्याने पायी जाणा-या दोन युवकांनी त्यांची चावी लावलेली स्प्लेंडर एमएच १५ एचव्ही ६१३५ पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार रोकडे करीत आहेत. तर निलेश सुरेश सोनटक्के (रा.कंगन अपा.आनंद नगर,जगताप मळा) यांची सुमारे दहा हजार रूपये किमतीची स्पिड सायकल गेल्या गुरूवारी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.