नाशिक – सरकारी नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणा-या संतोष मुळेला पोलिसांनी गजाआड केले आहे. मुळे याने ५० बेरोजगार तरुणांना ५१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर शासकीय कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणांकडून ५० हजार ते २ लाख रुपये तो घेत असे. मुळेने नांदेडमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु केले होते. सात वर्षांपासून हे प्रशिक्षण केंद्र चालवत होता. या पाटील पोलीस प्रशिक्षण अकादमीत सध्या १०० हून अधिक जण प्रशिक्षण घेत होते. या सर्व फसवणूक प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अट केली आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुळे हा मुळचा अहमदनगरचा जिल्ह्यातील रहिवासी असून गावी तो शेती करत असे. नाशिकला आल्यानंतर त्याने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा धंदा सुरु केला. त्याने नाशिक जिल्ह्यातील ४९ जणांना त्याने ५१ लाखांना गंडा घातला. मुळे याने M.SC Elec चे शिक्षण घेतले आहे. तो MPSC ची देखील तयारी करत होता. पत्नी आणि दोन मुलं असा त्याचा परिवार आहे.