नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बेकायदा शस्त्र बाळगणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई महामार्ग बसस्थानकर भागातील संदिप हॉटेल समोर करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून काडतुसाने भरलेल्या पिस्तूलसह धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केली.
जोसेस भालचंद्र तेजाळे (३४ रा.रामा अपा.हॅपीहोम कॉलनी,तुळशी आय हॉस्पिटल जवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. काही तरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने जोसेस तेजाळे हा शस्त्र घेवून फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२४) पथक त्याच्या मागावर होते. सायंकाळच्या सुमारास त्याच्या महामार्ग परिसरातील संदिप हॉटेल समोर असलेल्या मोकळया मैदानावर तो मिळून आला असून त्याच्या ताब्यातून काडतुसांनी भरलेला पिस्तूल व धारदार कोयता असा सुमारे १ लाख ११ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
संशयितास मुद्देमालासह मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र दिघे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत. ही कारवाई जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रेय चकोर,पोलीस नाईक रविंद्र दिघे,भुषण सोनवणे,मंगेश जगताप अंमलदार चारूदत्त निकम,भगवान जाधव मंगला जगताप व सविता कदम आदीच्या पथकाने केली.