नाशिक : शहर परिसरात वेगवेगळय़ा भागात भरदिवसा झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना भगूर येथे घडली. अशोक दगडू बिरछे (रा.इंदिरा संकुल,मोठा गणपती जवळ) यांनी याप्रकरणी तक्र्रार दाखल केली आहे. बिरछे कुटुंबिय रविवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून आतप्रवेश करीत लोखंडी कपाटातील तिजोरीकून १ लाख ८६ हजार ७७० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. या घरफोडी प्रकरणी सोमनाथ विठ्ठलराव काळे (रा.श्री हाईटस अहिल्याबाई होळकर चौक,जाधव संकुल) यांनी तक्रार दिली आहे.काळे कुटुंबिय सोमवारी (दि.२५) घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटातून सुमारे ६४ हजार ०८२ रूपये किमतीचे सोन्याचे अलंकार चोरून नेले. त्यास मंगळसूत्र व अंगठीचा समावेश आहे. ही घटना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.